वॉरिंगटन नव्हे वारी-टाऊन : श्रीकांत पट्टलवार- रुणकर्ण (UK)
वॉरिंगटन नव्हे वारी-टाऊन
लीना
आणि उर्मिला मावशी यांचे आशीर्वाद घेऊन सलग दुसऱ्या वर्षी वॉरिंगटन ते लंडन वारीचा काल
संध्याकाळी (८ जुलै २०२६) शुभारंभ झाला.
वारकऱ्यांची, विशेषतः
त्यांच्या रखुमाईंची सकाळपासूनच लगबग सुरू होती.
पंढरपूरला आषाढ सरी धो धो कोसळत असताना इंग्लंडला मात्र वैशाख वणवाच पेटला होता बर्चवूडच्या गर्द झाडीतून झुळझुळणारा थंड वारा त्यामुळे खूप आल्हाददायक वाटत होता. विठ्ठलाच्या जयघोषासह तोही जणू दिंडीत सामील झाला होता. वॉरिंगटनचे रहिवासी हा काय प्रकार आहे?- हाय, हॅलो, म्हणून वारकऱ्यांशी कुतूहलाने संवाद साधत होते. ही चक्क लंडन वारी हे कळल्यावर शुभेच्छा पण देत होते.
रस्त्या रस्त्यावरील घरांमधली रंगीबेरंगी फुले जणू या दिंडीचे स्वागत करत होते. "वासंतिक कुसुमातून तूच मधुर हासतोस"... वसंत बापटांच्या या ओळींप्रमाणे साक्षात विठ्ठल त्या फुलांमधून प्रसन्न होऊन वारकऱ्यांना आशीर्वाद देत होता.
वारंवार
होते ती वारी!
सलग दुसऱ्या वर्षीही ती वॉरिंगटन मधून निघाली. त्यामुळे आता
वॉरिंगटनला आता वारी-टाऊन म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल.
वारी टाऊनच्या वारकऱ्यांनी वारीचा ८ मैलाचा पहिला टप्पा विठ्ठल
नामाच्या जयघोषात अत्यंत उत्साहाने यशस्वीपणे पूर्ण केला. वाटेत येणाऱ्या इतर
गावांतील वारकरी पण त्यांना हळू हळू सामील होतील. ठिकठिकाणी भजन कीर्तनाचे सत्संग घडतील. पुढील यात्रेसाठी या सर्वांना
मन:पूर्वक शुभेच्छा.
*****
श्रीकांत पट्टलवार- रुणकर्ण (UK)
Comments
Post a Comment